139 कोटींचा माल उघडकीस
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील न्हावा- शेवा बंदरावर तस्करीविरोधात मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तब्बल 132 कंटेनर्स जप्त केले आहेत. चुकीची माहिती देत आयात केलेल्या या मालाची एकूण किंमत सुमारे 139 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कंटेनर्समध्ये सुमारे 3,029 मेट्रिक टन माल होता. या मालाची नोंद कागदोपत्री ‘तूरडाळ’ अशी करण्यात आली होती. मात्र, सखोल तपासात मोठा प्रकार उघड झाला. प्रत्यक्षात या कंटेनर्समध्ये टांझानिया आणि सुदान येथून आयात केलेल्या सुमारे 2,710 मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया, तसेच कॅनडातून आणलेले 319 मेट्रिक टन हिरवे वाटाणे आढळून आले. आयात निर्बंधांना चुकवण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या कारवाईमुळे बंदर परिसरातील अवैध आयात आणि चुकीच्या घोषणांच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. न्हावा -शेवा बंदरातून मोठ्या प्रमाणावर कंटेनर्सद्वारे विविध मालाची वाहतूक होत असताना अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित रॅकेटचा पूर्ण पर्दाफाश करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
