| चिरनेर | वार्ताहर |
मागील दोन-तीन दिवसांपासून उरणच्या खोपटा खाडी परिसरातील खाड्यांमधील मासे अचानकपणे मरत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली करण्यात आली होती. या तक्रारची दखल घेत संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तातडीने परिसरात पाहणी करण्यासाठी आले होते. या वेळेला त्यांनी खोपटाखाडी, कुंडेगावखाडी, परिसरात फिरून मेलेल्या माशांचे व दूषित पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक तपासणीत विषारी रसायनांमुळे पाणी प्रदूषित झाले असून, त्यामुळे मासे मेले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या खाड्यांच्या बाजूला अनेक ठिकाणी विषारी केमिकलचे कंटेनर धुतले जातात. अनेक वेळा अज्ञात वाहन चालक या खाडी परिसरात आपले टँकर खाली करून पळ काढतात. तसेच खाडीलगत आय.ओ.टी.एल सारखी कंपनी आहे. तसेच दिघोडे परिसरात देखील काही रसायनांचे टँकर साफ करणारे यार्ड आहेत. यार्डमध्ये असलेली ईटीपी यंत्रणा सांडपाणी व्यवस्थित शुद्ध करत नसल्याने हे विषारी दूषित पाणी खाडीत सोडल्यामुळे पाणी दूषित झाले असून करंजापासून ते दिघोडे चिरनेर पर्यंतच्या खाड्यांमधील पाणी दूषित झाले आहे.