| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पूर्व भागात सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून या नळातून अत्यंत गढूळ आणि दूषित येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला जोरदार सुरुवात झाल्यापासून उरण पूर्व भागातील ग्रामस्थांना गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दरम्यान, पेण तालुक्यातील जिते गावापासून ते उरणमधील गव्हाणफाटा पर्यंतच्या सर्व गावांना हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच, उरण पूर्व भागातील गावांनाही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे गव्हाणफाटा येथे जलशुद्धीकरण केंद्र असून, येथून पुढील गावांकडे सिडकोच्या विकसित हद्दीला पाणी शुद्ध करून दिले जाते. मात्र, जिते ते गव्हाणफाटा दरम्यानच्या मध्यवर्ती गावांना जलशुद्धीकरण न करता थेट अशुद्ध पाणी दिले जात असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी बाटलीबंद पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. तर, सामान्य नागरिकांना नाईलाजाने हे दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. सिडको प्रशासनाकडून या सर्व गावांकडून पाणीपट्टी बिलांची नियमित वसूली केली जाते. तरीदेखील नागरिकांना दूषित पाणी दिले जाते, असा संताप येथील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. तसेच, सिडको प्रशासनाने येथील नागरिकांना तात्काळ शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.







