मविआचा निर्धार, चहापानावर बहिष्कार
। नागपूर । दिलीप जाधव ।
राज्यपालांसह अन्य भाजप नेत्यांकडून शिवछत्रपतींचा होणारा अवमान, सीमाप्रश्न, ओला दुष्काळ, बेरोजगारी आदी मुद्यांवरुन सरकारला घेरण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. याचा निषेध म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी ( १९डिसेंबर) सुरु होत आहे.त्या पार्श्वभूमीवर विरोधी मविआतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शेकापचे आ.जयंत पाटील, एकनाथ खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आज येणार
उद्धव ठाकरे ठाकरे या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीची बैठक उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ, अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं.
राज्यपालांकडून शिवाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अवमानकारकरित्या उल्लेख होत आहे. त्यांच्याशिवाय अन्य भाजप नेतेही महापुरुषांबाबत अनादर करीत आहेत.त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. – अजित पवार, विरोधी पक्षनेते
महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावादाचा प्रश्न तापलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री धमकीची भाषा करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधे आक्रमकपणाने बोलतही नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातली काही गावे दुसर्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त करतात त्यावरही मुख्यमंत्री ठोसपणे काही भूमिका घेत नाहीयेत. तसेच राज्यातले प्रकल्प दुसर्या राज्यात जात असताना मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार डोळे उघडे ठेऊन बघत बसलेत. त्यामुळे लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली आहे. लाखो युवकांच्या हातून रोजगार गेलाय. विदर्भाच्या अनुशेषाचा प्रश्न कायम आहे, अतिवृष्टीत शेतकर्यांना मदत मिळालेली नाहीये, असे अनेक प्रश्न असताना राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाला जाणे आमच्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष एकमताने चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच सरकारने आयोजित केलेला अधिवेशन कालावधी वाढवून किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी केली.
गदारोळापेक्षा कामकाज करु
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाचा एका मिनिटाचा वेळही गोंधळामुळे वाया जाऊ नये, सर्व विधेयके चर्चेनंतरच मंजूर होतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून आम्ही घेतली. हिवाळी अधिवेशनातही आमची तीच भूमिका, प्रयत्न असणार आहे. राज्याच्या विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. परंतु, महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणार्या, महाराष्ट्राच्या भूमीचे लचके तोडणार्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळणार्या, महाराष्ट्राच्या हिताशी प्रतारणा करणारी कुठलीही व्यक्ती, वक्तव्य, निर्णय, कृतीला आमचा ठाम विरोध राहील. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं कर्तव्यही आम्ही निश्चित पार पाडू असे अजित पवार यांनी सांगितले.