भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

। ठाणे । प्रतिनिधी ।

बदलापूर पश्चिम येथील वडवली मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने एका कंत्राटी कर्मचाऱ्याला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

बदलापूर पश्चिममधील वडवली येथे बारवी धरण रस्त्यावर हा अपघात झाला असून या अपघातात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष पडवळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संतोष पडवळ आणि त्यांचे सहकारी पाण्याची कळ सुरू करण्यासाठी वडवली येथील पाण्याच्या टाकीजवळून वडवलीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने पडवळ यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पडवळ ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी ट्रक चालकाला तात्काळ ताब्यात घेतले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडवळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेला.

Exit mobile version