वेतन मिळत नसल्याने कंत्राटी शिक्षकाची आत्महत्या

कर्मचारी संघटनेने केला सरकारच्या धोरणाचा निषेध

| अलिबाग | वार्ताहर |

वरवणे आश्रम शाळेतील तासिका तत्वावर कार्यरत शिक्षक महादेव जानू वारगुडे मु. हेदोशी (अधर्णे) ता.पेण, जि. रायगड यांनी वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे सोमवारी आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या घरातील संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती. एक भाऊ मतिमंद आहे. लहान मुले आणि तरुण पत्नी तसेच भाऊ आणि कुटुंबाची जबाबदारी पेलणे अशक्य झाल्याने त्यांनी शेवटी आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे. ही बाब सरकारने आत्मचिंतन करण्याची आहे. सरकार सर्वच क्षेत्रात कंत्राटीकरण आणि खासगीकरण करू पहात आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तासिका शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अर्धवेळ कर्मचारी, मानधन वरील कर्मचारी यांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेतले जात आहे. या कर्मचाऱ्यांचा कुटुंब खर्च भागविणे अवघड जात आहे. सरकार रोज नवनवीन योजना जाहीर करीत आहे. शासकीय कार्यक्रम, मंत्री, अती नेते यांचे दौरे तसेच जाहिराती यावर वारेमाप खर्च केला जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांवर खर्च परवडत नाही अशी खोटी ओरड केली जात आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा आणि सर्व सरकारी यंत्रणा कमकुवत करण्याची धोरण तयार करण्याच्या सरकारच्या धोरणाचा सरकारी कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, या संदर्भात आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या महिन्यात वारगुडे यांनी 20 दिवस काम केले आहे. त्याचे मानधन महिना संपल्यानंतर मिळणार आहे. या व्यतिरिक्त त्याचे कुठलेही मानधन आमच्या कार्यालयाकडे थकीत नाही. यापूर्वी दोन वर्षे त्यांनी नियमित काम केले. मात्र या वर्षात ते अनियमित होते असेही अहिरराव यांनी स्पष्ट केले.
Exit mobile version