वादग्रस्त नायब तहसिलदार सिराज तुळवे यांना दंड

| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तहसिल कार्यालयात सध्या नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेले वादग्रस्त नायब तहसिलदार सिराज तुळवे यांना अर्जदाराने माहिती अधिकार 2005 अंतर्गत मागवलेली माहिती वेळेत न दिल्याने राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ यांनी 4000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रोहा तहसिल कार्यालयात कार्यरत असणारे नायब तहसिलदार सिराज तुळवे यांचे नाव पूर्वी दिव येथील जमीन घोटाळ्यात पुढे आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची रोहा येथून बदली करण्यात यावी यासाठी रोहा शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी तक्रार अर्ज देखील दिला आहे. वावेखार येथील रहिवासी धनाजी हरिभाऊ ठाकूर यांनी वावे पोटगे येथील गट क्रमांक 128 ए ,100,124(100),135(121) व वावेखार येथील गट क्रमांक (133)67(121)289(101)210(237)230(237)266(101)127(101)66(225)238(129)4(129) या जागांचे सात बारा उतारे, आठ अ व फेरफार नोंदींची 2010 ते 2018 या कालावधीतील माहिती मागितली होती. पण अर्जदार यांना वेळेत माहिती देण्यात आली नाही. यामुळे अर्जदार यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे द्वितीय अपिल दाखल केले होते. माहिती देण्यास झालेल्या दिरंगाई बाबत जनमाहिती अधिकारी तुळवे यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात आला असून माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 20(1) अन्वये चार हजार रुपयांची शास्ती सिराज तुळवे यांना लावली आहे. यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत माहिती मागितल्यानंतर ती देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी वर्गाला जरब बसेल असे बोलले जात आहे.

Exit mobile version