टी-20 विश्वचषकावरून वाद

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाबाबत या स्पर्धेदरम्यानच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता आयसीसीच्या वार्षिक बैठकीत यावर चर्चा होणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या या बैठकीपूर्वीच आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.

श्रीलंकेत 19 जुलैपासून होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीपूर्वीच नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या खराब नियोजनावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर इव्हेंट हेड ख्रिस टेटली आणि मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक क्लेअर फर्लाँग यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक आयसीसी सदस्यांनी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये विशेषत: अमेरिकेत आयोजित स्पर्धांमध्ये बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. असोसिएट सदस्य संचालक पंकज खिमजी यांनी सर्व सभासदांना पत्र लिहून कार्यक्रमादरम्यान झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version