पत्रकारांच्या उपस्थितीवरून वाद
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदेची बुधवारी (दि.25) पार पडलेली सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांवरून गोंधळात पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच पत्रकारांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी वाद निर्माण झाला. तर, समुद्रकिनाऱ्यावरील टपऱ्यांच्या प्रश्नावरून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी सभागृहात उपस्थित पत्रकारांबाबत आक्षेप घेत, यांना कोणी बोलावले? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. अनेक सदस्यांनी पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार असल्याचे सांगत भूमिका मांडली. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी नियमावली स्पष्ट केल्यानंतर पत्रकारांना सभेत बसण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावरील अतिक्रमित टपऱ्यांचा मुद्दा सभेत गाजला. नगरसेवक भावेश मांजरेकर यांनी टपऱ्या परस्पर भाड्याने देण्याच्या प्रकारावरून प्रशासनावर टीका केली. तसेच, टपरीधारक आणि घोडागाडी चालकांमधील वादाचा व्हिडिओ सभागृहात दाखवण्यात आला. त्यामुळे किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सभेत किनाऱ्यावरील व्यवसायाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, व्यवसायासाठी स्थानिक रहिवाशांनाच प्राधान्य देण्यात येणार असून सर्व टपरीधारकांसाठी परवाना व फूड लायसन्स बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, केवळ चहा व नाश्ता विक्रीला परवानगी देण्यात येणार असून जेवण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, वन विभागाच्या हद्दीतील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषद व वन विभाग संयुक्त मोहीम राबवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.







