स्मशानभुमीचे डंपिंग ग्राऊंडमध्ये रुपांतर

कर्जत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
। कर्जत । प्रतिनिधी ।
स्वर्गीय अनंताकाका जोशी यांनी जोपासलेल्या कर्जत स्मशानभुमीचे काम एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे त्या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. नगरपरिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मशानभुमीचे रुपांतर डंपिंग ग्राऊंडमध्ये होत आहे अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी दिली आहे. ज्यावेळी कर्जत नगरपरिषद ग्रामपंचायत म्हणुन अस्तित्वात होती, त्यावेळी शहरातील मृत व्यक्तींना अंत्यसंस्कार करण्यास स्मशानभुमीची आवश्यकता होती. त्यावेळी अनंताकाकांनी पुढाकार घेऊन आपल्या व्यापारी मित्रांना तसेच शहरातील सहकार्‍यांच्या सहाय्याने कर्जत स्मशानभुमीची निर्मिती केली आणि स्मशानभुमीतच अंत्यविधीसाठी लागणार्‍या लाकडांची देखील सोय केली. मात्र आता या स्मशानभुमीची दयनीय अवस्था झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागी व मुख्य बाजारपेठ रस्त्यालगत असलेल्या स्मशानभुमीच्या प्रवेशद्वारापासून ते आतील सर्व भागात कचर्‍याचे मोठमोठे ढीग तयार होत चालले आहेत. वाढलेल्या जंगली गवतामुळे व पडलेल्या वृक्षामुळे स्मशानभुमीचेच स्मशान झाले आहे. दरम्यान नवनिर्वाचित कर्जत स्मशानभुमी समितीने स्मशानभुमीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आणि सुमारे 80 लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आले. परंतु, मागील दोन अडीच वर्षांपासुन आराखड्याप्रमाणे सुरू असलेल्या स्मशानभुमीचे काम पुर्ण न झाल्याने तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कर्जत स्मशानभुमी डंपिंग ग्राऊंडमध्ये रुपांतरीत होत आहे.

Exit mobile version