| दांडगुरी | वार्ताहर |
पर्यटनातून विकास साधायचा असेल तर येथे भेट देणार्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितता पुरविण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन नूतन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिघी पोलीस ठाण्याला भेट देताना घार्गे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यांनी प्रथमच दिघी सागरी पोलीस ठाण्याला वार्षिक तपासणी दरम्यान भेट दिली. नागरिकांशी मोकळे पणाने चर्चा केली. या वेळी उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमन, महमद मेमन, सुकुमार तोंडलेकर, निवास गाणेकर, शब्बीर फक्किर, शाम भोकरे, पोलीस पाटिल रत्नाकर पाटिल, उदेश वागजे, दिलीप नाक्ती, गायत्री शेलार, सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
या वेळी पोलीस अधीक्षक म्हणाले की, श्रीवर्धन तालुक्यात विस्तीर्ण समुद्र किनार्यामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय खूप बहरला आहे. हा व्यवसाय आणखी वृद्धींगत होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेलाही सर्वांनीच सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.
तालुक्यात सर्वच किनारी वॉटर स्पोर्ट सुरु करण्यात आलेले आहे. यामधून तरुणांना रोजगार मिळत आहे. पण त्यासाठी आवश्यक ती सुरक्षा घेणेही गरजेचे आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडते आणि व्यवसायावर परिणाम होतो, वॉटर स्पोर्ट व्यवसाय करणार्यांनी पर्यटकांना लाईफ जॅकेट पुरविणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. अनेकदा नियमांचे उल्लंघन होताना दिसते. यासाठी पोलिसांनीही कायद्याप्रमाणेच कारवाई करुन योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरुन येथे पर्यटनासाठी येणार्या प्रत्येक पर्यटकाला आपण सुरक्षित आहोत याची जाणीव होईल. पर्यटक सुरक्षित राहिला तर त्यातूनच व्यवसाय वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी महमद मेनन म्हणाले की, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या हातून खूप चांगला कार्य व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्व अधिकारी वर्ग प्रशांत स्वामी, संदिप पोमन, व सर्व कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करतात त्यामुळे या ठिकाणी कुठलेही वाद झाले तरी सामाजिक तत्त्वावर मिठवले जातात पण जर एखाद तसाच विषय पोलीस स्टेशनवर आला योग्य निर्णय घेऊनच करवाई केली जाते.असे त्यांनी सांगितले.