पोलीस परीक्षेसाठी लाच घेणार्‍या पोलिसाला अटक

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड पोलीस दलाच्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत मदत करण्यासाठी एक लाख रुपये घेणार्‍या नवी मुंबईच्या पोलीस हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रोहा परिसरात घडली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस हवालदार मोकल असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. तो नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तसेच उमेदवार हा रोहा तालुक्यातील आहे. या पोलीस कर्मचार्‍याची व उमेदवाराची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली.

रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी मदत करण्यासाठी त्याच्याकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. हा व्यवहार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होता. ही बाब रायगड पोलीसांच्या लक्षात आल्यावर पडताळणी करून 31 मार्च रोजी पोलीस हवालदार मोकल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली असून याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मोकल याला न्यायालयात हजर केली असून न्यायालयाने त्याला पाच एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत.

Exit mobile version