सात महिन्यांनंतर एक लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा संपूर्ण देशाची चिंता वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 17 हजार 100 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत 28.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. महत्त्वाचे म्हणजे, देशात सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त केसेस आल्या आहेत. याआधी 6 जूनला एक लाख रुग्ण आढळले होते. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रुग्ण आढळले असताना, 30 हजार 836 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील पॉझिटिव्हिटी रेट 7.74 टक्के इतका आहे.
देशात सध्याच्या घडीला 3 लाख 71 हजार 363 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एकूण 4 लाख 83 हजार 178 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रात 36 हजार 665 रुग्ण असून यानतंर पश्चिम बंगाल (15,421), दिल्ली (15097), तामिळनाडू (6983) आणि कर्नाटकचा (5031) क्रमांक आहे. देशातील एकूण 67.29 टक्के रुग्ण या पाच राज्यांमधूनच आहेत. तर एकूण 30.97 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.







