कर्जतमध्ये कोरोना वाढतोय

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हॉटस्पॉट बनला होता. या ठिकाणी आता पुन्हा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. सध्या कर्जत तालुक्यात चार कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यात कर्जत शहरातील एक खासगी डॉक्टर बाधित झाला आहे. आज कर्जत तालुक्यात चार रुग्ण कोरोना बाधित असून, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य विभागाकडून पुन्हा खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.कर्जत तालुक्यात आतापर्यंत 7284 रूग्णांना कोविड 19 झाला होता.

त्यातील 6969 रुग्ण यांनी कोरोनावर मात केली होती. तब्बल 311 रुग्णांचे बळी कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील हा मृत्यूचा आलेख जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आगामी काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version