सलग तिसर्या वर्षी देशाबाहेर स्पर्धेची तयारी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना व्हायरसच्या पेशंट्सची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. देशातील कोरोनाचे आकडे चिंताजनक झालेले असतानाच बीसीसीआयच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष आयपीएल स्पर्धा देशाच्या बाहेर खेळवण्यात आली होती. मागच्या वर्षी देशात स्पर्धा सुरू झाली. पण, आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्थगित करावी लागली. त्यानंतर सहा महिन्यांनी यूएईमध्ये स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना सलग तिसर्या वर्षी भारताच्या बाहेर आयपीएल होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा भारतामध्येच खेळवण्याची बीसीसीआची प्राथमिकता आहे. पण, तशी परिस्थिती निर्माण झाली तर बाहेरच्या देशातही स्पर्धा घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. सरकारकडून जाहीर होणार्या नियमांवर बरंच काही अवलंबून असेल, असे या अधिकार्याने सांगितले. फेब्रुवारी महिन्यात होणारे आयपीएल ऑक्शन हे आमच्यापुढील मोठे आव्हान आहे. हे ऑक्शन झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत विचार केला जाईल असे या अधिकार्याने स्पष्ट केले. आगामी सिझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद शहराच्या आयपीएल टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत.