खारेपाटात ‌‘कॉर्पोरेट खोत’ फिरताहेत; शेकापक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील कडाडल्या

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

खारेपाटामध्ये नव्या स्वरूपातील ‌‘कॉर्पोरेट खोत’ फिरू लागले असून, जमीन, अस्तित्व आणि स्थानिक हक्कांवर डोळा ठेवणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच निर्णायक ठरणार आहे, असा घणाघात शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

रायगडचे भाग्यविधाते स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील आणि स्व. ॲड. दत्ता पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्या पुढे म्हणाल्या की, मी जेव्हा आमदारकीला उभी राहिले, तेव्हा खारेपाटात माझा तितका संपर्क नव्हता. पण इथल्या कार्यकर्त्यांची जिद्द, संघर्षाची ताकद आणि घराघरात पोहोचण्याची तळमळ मला नेहमी प्रेरणा देत आली. ज्येष्ठ कार्यकर्ते अमरनाथ गुरुजी यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता घर, कुटुंब आणि पक्ष सोडून गेलेल्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, जेव्हा घरावर भाजपाचा झेंडा लागला, तेव्हा भाईंना खोत परत आल्यासारखे वाटले. त्यांना याचे अतीव दुःख झाले होते. परंतु, या दुःखातून सावरण्याचे काम येथील कार्यकर्त्यांनी दूर केल्यामुळेच ते पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. त्याप्रमाणे आंबेपूर मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार पूजाचा विजय हेच त्या दुःखावरचे औषध ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्व. नारायण नागू पाटील यांनी ज्या भूमीत खोतीविरोधात लढा दिला, तिथे आज नव्या पद्धतीचे कॉर्पोरेट खोत फिरत आहेत, असा टोला लगावत त्यांनी जमीन आणि हक्क वाचवण्यासाठी शेकापची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. रस्ते, मुलींना सायकल वाटप, पोयनाड बाजारपेठेतील रस्ता यांसारखी कामे शेकापमुळेच शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.

आपला पक्ष डाव्या विचारांचा आहे. घरातील उमेदवार न देता पूजासारखी वकील उमेदवार देण्याचा भाईंचा निर्णय हा पक्षनिष्ठेचा आदर्श आहे, असे सांगत त्यांनी पूजाचे कौतुक केले. भानगडी कमी करा, वकील आलेली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार, असा सवाल त्यांनी विचारला. ही निवडणूक शेकापसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर विजय आपलाच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोयनाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा उल्लेख करत त्यांनी महागाई, जीएसटी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. कमळ आणि त्याचे मित्रपक्ष नकोत, अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये असल्याचे त्या म्हणाल्या. शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार समोरच्यांचे डिपॉझिट जप्त करूनच परत येतील, असा इशारा दिला.

Exit mobile version