काराव ग्रामपंचायतीमध्ये करोडोंची अफरातफर

यशवंत मोतीराम म्हात्रे यांचा आरोप

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सबल ग्रामपंचायत म्हणजे काराव ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाने मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचा आरोप गडब गावचे ग्रामस्थ (आरटीआय संकलनकर्ता) यशवंत मोतीराम म्हात्रे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पेण यांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेले आहे. तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर ग्रामसेवक चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचेदेखील नमूद केले आहे.

सन 2018 ते 2022 या कालावधीत सरपंच अर्पणा तुलसीदास कोठेकर असून, 2018 ते 2019 या कालावधीत सुनील नेरकर या ग्रामसेवकाने 2 कोटी 90 लाख 71 हजार 268 रुपयांची अफरातफर केली आहे. तर, 2019 ते 2022 या कालावधीत संजय जाधव या ग्रामसेवकाने 4 कोटी 70 लाख 85 हजार 522 रुपयांची अफरातफर केली आहे. अशी एकूण दोन्ही ग्रामसेवकांच्या कालावधीत 7 कोटी 61 लाख 56 हजार 790 रुपयांची अफरातफर करुन संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप यशवंत म्हात्रे यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे. याबाबत ग्रामसेवक सुनील नेरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

गटविकास अधिकारी यांनी सदरील प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी यशवंत म्हात्रे यांनी केली असून, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी योग्यप्रकारे न झाल्यास सदरील बाब वरिष्ठ पातळीवर नेऊन ग्रामविकासमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असे ते म्हणाले.

योग्य ती चौकशी करुन अहवाल पुढे पाठवू
या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोल यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदर तक्रार माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. तसेच विस्तार अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन योग्य ती चौकशी करुन सदरील अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. पुढच्या आठवड्यात तक्रारदारांना बोलावून समोरासमोर विचारणा केली जाईल.

माझ्यावर केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत
भ्रमणध्वनीवरुन काराव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसविकास अधिकारी संजय जाधव यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, अफरातफरीचे केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असून, आरोपकर्त्यानी मी अफरातफर केल्याचे सिद्ध करावे अन्यथा मी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकेन.

Exit mobile version