मीटर कॅलिब्रेशन करताना बिना पावती रिक्षा चालकांकडून उकळण्यात येत आहेत दीडशे रुपये
| पनवेल | दीपक घरत |
मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून लूट केली जात असल्याचा आरोप काही रिक्षा चालकांनी केला आहे. कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून दंडाच्या रकमेसोबतच अतिरिक्त दीडशे रुपये उकळले जात असून, या रकमेची पावती सुद्धा दिली जात नसल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे.
रिक्षा संघटनांनी भाडे दर वाढीच्या केलेल्या मागणी नंतर 22 डिसेंबर पासून भाडे वाढ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र या करता नव्या दराप्रमाणे मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट प्रादेशिक परिवहन विभागाने ठेवली आहे. या करता 15 जानेवारी पर्यंतची मुदत रिक्षा चालकांना देण्यात आली होती. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा चालकांना दर दिवशी 50 रुपये दंड आकरला जाणार असल्याने दंडापासून वाचण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालया बाहेर रिक्षा चालकांच्या मोठ्या रांगा सध्या लागल्या आहेत. याचाच फायदा उचलन्यासाठी सक्रिय झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दंडाच्या रकमेसोबत अतिरिक्त दीडशे रुपये वसुल केले जात असून या रकमेची कोणतीही पावती रिक्षा चालकांना दिली जात नसल्याने रिक्षा चालक संताप व्यक्त करत आहेत.
मीटर प्रामाणित केल्याची पावती दाखवल्या नंतर त्याची नोंद प्रादेशिक विभाग करून घेते. त्या नंतर दर दिवशी 50 रुपये प्रमाणे दंडा ची रक्कम वसुल करून त्या रकमेची पावती रिक्षा चालकांना दिली जाते. मात्र या रकमे सोबत अतिरिक्त वसुल करण्यात येणाऱ्या दीडशे रुपयांची पावती दिली जात नसून, खाजगी दलाला ही सगळी वसुली करत आहेत असा आरोप रिक्षा चालक करत आहेत.