आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मानकुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसेवकांकडून लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. सहा लाखांहून अधिक रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. एकाच कामाची अनेक बिले काढून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत निकेत पाटील यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली आहे. याप्रकरणी सहाय्यक संचालक, स्थानिक निधी, लेखा परीक्षा विभागाकडून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील मानकुळे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत पाणीपुरवठा खर्च 98 हजार 600 रुपये, स्वच्छता खर्च 74 हजार 600, शिक्षण विभागाखालील खर्च 74 हजार 600 रुपये दाखविण्यात आला आहे. हे सर्व खर्च एकसारखे असल्याने संशयास्पद वाटत आहे. प्रत्यक्ष कामे न करता, केवळ 15 वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2023 व नोव्हेंबर 2024 या कालावधीत पाणीपुरवठा खर्च 1 लाख 44 हजार रुपये इतका दाखविण्यात आला होता. त्यामुळे ही कामे न करता, खर्च दाखविल्याचा आरोप करण्यात येत आहे. 13 एप्रिल 2025 मध्ये एलईडी बल्ब खरेदीसाठी 1 लाख 8 हजार 400 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. 1 जुलै 2023 मध्येदेखील 1 लाख 8 हजार 400 रुपये खर्च झाल्याचे नाोंदविण्यात आले आहे. दोन्ही तारखा वेगवेगळ्या असल्या तरी खर्चाची रक्कम तंतोतत एकसारखी असणे संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. एकाच प्रकारच्या बल्बसाठी फक्त चार महिन्यांच्या अंतराने पुन्हा तितकाच खर्च दाखविण्यात आला आहे. दोन्ही खरेदी मिळून एलईडी बल्बचा एकूण खर्च 2 लाख 16 हजार रुपये इतका होत आहे.
मानकुळे ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी सुमारे 6 लाख रुपयांहून अधिक खर्च दाखविल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात निकेत पाटील यांनी आवाज उठविला आहे. आपले सरकार पोर्टलवर त्यांनी तक्रार दाखल करून कामांचे लेखा परीक्षण करण्यात यावे, बिल आदींचा ताळमेळ तपासण्यात यावा, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीनुसार केली आहे. याबाबत ग्रामसेवक केणी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. मानकुळेमध्ये पाणी योजनेसह बल्ब खरेदीसह इतर कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत आपले सरकार पोर्टलवर त्यांनी तक्रार केली असून, त्याची दखल घेण्यात आली आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीनंतर ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार अधिक समोर येण्याची शक्यता आहे.
