रत्नागिरीत बनावट नोटांची छपाई

प्रिंटिंग प्रेसमालकाला अटक

। रत्नागिरी। प्रतिनिधी ।

गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. रत्नागिरीतील प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमध्ये बनावट नोटांची छपाई सुरु असल्याच्या माहितीवरून कारवाई करत प्रिंटिंग प्रेसच्या मालकाला अटक केली असून ही आतापर्यंतची सातवी अटक आहे.

भारतीय चलनातील बनावट नोटा वितरीत करण्यासाठी मानखुर्द उड्डाण पुलाजवळ असलेल्या शहानवाज शिरलकर, राजेंद्र खेतले, संदीप निवलकर आणि ऋषीकेश निवलकर यांना गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या नेतृत्वातील पथकाने बनावट नोटांसह रंगेहात अटक केली. आरोपींची चौकशी केली असता, चिपळून नागरी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक अमित कासारने या बनावट नोटा दिल्याचे उघडकीस आले असता कासार याला अटक केली. कासार याच्या चौकशीत एका वकिलाचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर येताच वकिलालाही अटक करण्यात आले आहे.

बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमध्ये करण्यात आल्याचे उघड होताच गुन्हे शाखेने प्रेसमालक प्रसाद राणेला ताब्यात घेतले आहे. तसेच, बनावट नोटांची छपाई केलेले प्रिंटिंग मशीनही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी राणे याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version