। सुधागड-पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात शिकार्यांचा वावर असल्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांनी मंगळवारी (दि.11) मध्यरात्री एकाचा शिकारी असल्याच्या संशयाने पाठलाग केला असता त्या ठिकाणी बंदूक सापडली. मात्र, संबंधित व्यक्ती फरार झाला असल्याने त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
होळीच्यानिमित्ताने होळीच्या लाकडांसाठी जंगलतोड होऊ नये यासाठी वन विभागाचे गस्ती पथक मंगळवारी रात्री सुधागड तालुक्यातील पुई गावाच्या परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना अचानक टॉर्चचा प्रकाश दिसला. मध्यरात्रीच्या सुमारास टॉर्चचा प्रकाश दिसल्याने गस्ती पथकाचा संशय वाढला. त्यांनी त्या बाजूला शोध घ्यायला सुरुवात केली असता संशयीताने हातातील बंदूक जंगलात टाकून पळ काढला. वन विभागाच्या गस्ती पथकाने त्याचा पाठलाग केला. परंतु, तो अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, वन विभागाच्या गस्ती पथकाने त्याची बंदूक जप्त करून पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानी शिंदे, संकेत गायकवाड, नामदेव मुंढे, विनोद चव्हाण, संदीप ठाकरे, प्रियंका तारडे (सर्व वनरक्षक), वनपाल उत्तम शिंदे यांचा सहभाग होता. तसेच लिपिक संतोष भिंगारदिवे यांचेही सहकार्य लाभले.