| पनवेल | प्रतिनिधी |
पैशांचा पाऊस पाडण्यासह दम्याचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून नाशिक येथील कथित भोंदूबाबाने पनवेलच्या दाम्पत्याची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
पनवेलमध्ये राहणारी तक्रारदार महिला दम्याच्या आजाराने त्रस्त होती. 2022 मध्ये तिच्या पतीला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अरुण पाटील हा अघोरी पूजेच्या माध्यमातून आजार बरा करतो, अशी माहिती मिळाली. त्यानंतर दाम्पत्याने त्याची भेट घेतली. काळभैरव पूजा करून आजार बरा करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष त्याने दाखविल्याचा आरोप आहे.
या पूजेसाठी त्याने 50 हजार रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी 25 हजार रुपये आगाऊ घेतले. काही दिवसांनी दोन अनोळखी व्यक्ती दाम्पत्याला नाशिक येथे घेऊन गेल्या. तेथे महिलेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला गोदावरी नदीकिनारी नेण्यात आले. यावेळी तिला पांढरे पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास सांगून अघोरी पूजा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर महिलेची प्रकृती पुन्हा बिघडल्याने दाम्पत्याने अरुण पाटील याच्याशी संपर्क साधला. त्याने पुढील पूजेसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. पुन्हा दाम्पत्याला गोदावरी नदीकिनारी नेऊन पूजा करण्यात आली. बोकडाचा बळी देऊन पुढील विधी केला जाईल, असे सांगून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, पैशांचा पाऊस पडला नाही आणि आजारही बरा झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी अरुण पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
फसवणुकीची जाणीव
भोंदूबाबावर विश्वास बसल्याने त्याने घरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पाच लाख रुपये घेत विशेष पूजा करण्याचे प्रलोभन दाखवले; मात्र अनेक दिवस उलटून ना पैशांचा पाऊस पडला, ना आजार बरा झाला. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
