| अलिबाग | संतोष राऊळ |
रायगडसह संपूर्ण देशात कोरोना साथीने मोठे थैमान घातले होते. अशा भयंकर साथीत कुठल्याही निधीची अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत काम करणार्या कोव्हिड योद्ध्यांना सरकारी नोकर्यांमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी रविवारी (दि.20) अलिबाग येथे केली.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथे रविवारी सकाळी 11 वा. कोव्हिड योद्धांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलेे. यावेळी म्युनिसिपल कामगार एकता युनियनचे अध्यक्ष कॉ. मनोज यादव, सचिव कॉ. जगनारायण गुप्ता (कहार), उपाध्यक्ष कॉ. प्रमोद नवार, कॉ. सुशील देवरुखकर, कॉ. अशोक पवार हे मार्गदर्शक उपस्थित होते.
अडीच वर्षापूर्वी कोरोना साथीने अवघ्या विश्वाला व्यापले होते. त्याची झळ रायगडलाही मोठ्या प्रमाणात बसली आहे. हजारो जणांचे बळी या साथीत गेलेले आहेत. कित्येक कुटुंबाची कर्ती सवरती मंडळी आपण गमावली आहेत. अशा भयंकर स्थितीत राज्यातील आरोग्य सेवेवर कमालीचा ताणही पडला. आरोग्य सेवेतील कमतरताही जाणवून आली. पण त्यावेळच्या तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने मोठ्या हिमतीने या साथीला तोंड देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले.
कोरोना साथीत जिथे रुग्ण दाखल केला जात असे त्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी डॉक्टर्सही जायला घाबरत होते. त्या भयानक स्थितीत रुग्णांची देखभाल कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणार्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतोय.
आ.जयंत पाटील
सरचिटणीस, शेकाप
या साथीत ज्याने कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले त्यांना सरकारी नोकऱ्यांत स्थान मिळालेच पाहिजे, अशी आपली प्रथमपासूनच आग्रही मागणी राहिलेली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही आपण याच मुद्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही ही मागणी लावून धरली होती. ज्या कोरोना योद्ध्यांनी साथीत काम केले त्यांना सरकारी नोकर्यांमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवल्या जाव्यात, अशी आपली आजही आग्रही मागणी असल्याचे जयंत पाटील यांनी सूचित केले.
यासाठी आवश्यक त्या मुलाखती घेऊन जे पदवीधर आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेचे काम द्यावे, जे पदवीधर नाहीत त्यांनाही योग्य क्षमतेचे काम दिले जावे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली. या मागणीसाठी आपण विद्यमान सरकारकडेही पाठपुरावा करु, अशी ग्वाहीही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.
युनियनचे अध्यक्ष कॉ. मनोज यादव यांनी जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रारंभी प्रास्ताविक कॉम्रेड अशोक पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोव्हिड योद्धयांना सरकारी नोकरीत घेऊ असे आश्वासन दिले असल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात कामगार युनियन ने हा विषय घेतला आहे.
यावेळी युनियनचे पदाधिकारी गोपाळ यादव, प्रतीक महाले, अविनाश गोपाळे, अभिजीत जाधव, शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे, कु.गावंड यांनीही आपले विचार मांडले. या सर्व कोव्हिड योद्धांना बोनस अथवा बक्षीस म्हणून किमान 25 हजार रुपये देण्यात यावे. तसेच नगरपालिका, महानगरपालिका व अन्य शासकीय रुग्णालये व अन्य ठिकाणी सामावून घेण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल कामगार एकता युनियनने केली आहे.
या मेळाव्यात कोरोना महामारीत जे तरुण-तरुणी शासकीय, निमशासकीय अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेचे काम करीत होते, त्या सर्वांना सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे. कोव्हिड योद्धांना जाहीर करण्यात आलेला कोव्हिड भत्ता त्वरित देण्यात यावा. कोव्हिड योद्धांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्यावतीने करण्यात आली.