कत्तलीसाठी गुरे नेणार्‍यांचा प्रयत्न गोरक्षकांनी उधळला

। पोलादपूर । वार्ताहर ।

पोलादपूर महाबळेश्‍वर मार्गावर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना कत्तलीसाठी गुरे नेण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी हाणून पाडला आहे. पोलादपूर पोलिसांनी वाहन चालकावला अटक केली असून याप्रकरणी 13 जणांविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलादपूर कापडे फाटयावर शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने आणि स्थानिकांच्या मदतीने मोठी कारवाई केली. वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्री जावेद वालवटकर हा महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये सहा गुरांना घेऊन कत्तलीसाठी नफ्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूरच्या गोरक्षकांना मिळाली. रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गोतस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गाईंना जीवदान देण्यात तसेच जावेद वालवटकर याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात गोरक्षकांना यश आले.

याप्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद वालवटकर याच्यासह मंगेश खेडेकर, सज्जाद, रियाज कचकोल, आसिम कुदेकर, फाईक मदगडी, नासीर हकीम, रफिक उलडे, मोतशीम, नईफ बाबर, शाहिद खान, इरफान, अन्वर सय्यद अशी आरोपींची नावे असून पोलादपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, यातील अवैध गुरे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन बोलेरो पिक 5 लाख रूपये अंदाजे किंमत, एक तांबडया रंगाची व मोठे शिंग असलेली गाय किंमत 30 हजार, एक तांबडया रंगाची व मोठे शिंग असलेली गाय किंमत 35 हजार, एक तांबडया रंगाची व आखुड शिंग असलेली गाय किंमत 25 हजार, एक गर्द तांबडया रंगाची लांब शिंग असलेली गाय किंमत 20 हजार, एक काळया रंगाचे आखुड शिंग असलेले वासरु किंमत 15 हजार आणि एक तांबडया रंगाची कालवड 15 हजार असा मुद्देमाल पोलादपूर पोलिसांनी हस्तगत केला.

Exit mobile version