गणेशोत्सवामध्ये सात दिवसांत 45 गुन्हे दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या कालावधीत अवैधरित्या दारु वाहतूक, निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात दिवसांमध्ये गावठी दारुसह देशी-विदेशी दारु विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईत 45 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून, नऊ लाख सात हजार 865 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 28 जणांना अटक करण्यात यश आले आहे.
कोकणासह रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यामध्ये एक लाख हून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना 14 सप्टेंबरला झाली. जिल्ह्यात सर्वत्र धार्मिक व सांस्कृतिक धामधूम सुरु होती. याचा फायदा घेत काही मंडळी गावठी, देशी-विदेशी दारु विक्री, वाहतूक व निर्मिती करीत असल्याची माहिती रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कालावधीत कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहिमेद्वारे कारवाई सुरु केली. जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि.14) ते रविवारी (दि.20) या सात दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 45 गुन्हे दाखल करून 28 आरोपींना अटक करण्यात आली.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा, सार्वजनिक मंडळांचे कार्यक्रम आणि विविध ठिकाणी होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले होते. हातभट्टी दारूनिर्मितीची ठिकाणे, अवैध मद्यविक्री केंद्रे तसेच मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पथकांकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे अवैध दारु, विक्री, वाहतूक व निर्मिती करणाऱ्यांना दणका मिळाला. या कारवाईमध्ये 422 लीटर गावठी दारू आणि 14 हजार 600 लिटर रसायन तसेच 59.58 बल्क लिटर देशी मद्य आणि 60.18 बल्क लिटर विदेशी मद्यही जप्त करण्यात आले आहे. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक वाहनही विभागाने ताब्यात घेतले. गणेशोत्सव काळात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विभागाकडून विशेष पथकांच्या माध्यमातून तपासणी आणि कारवाई करण्यात आली. उत्सवाच्या काळात बेकायदेशीर मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक होऊ नये, यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
अधीक्षकांकडून नागरिकांना आवाहन
बनावट मद्य, शासनाचा कर किंवा उत्पादन शुल्क चुकवून होणारी मद्यविक्री तसेच हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री याबाबत नागरिकांकडे माहिती असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1800 233 9999 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक आदित्य पवार यांनी केले आहे.







