मुंबई-गोवा महामार्गावरील क्रॅश बॅरियरचे काम निकृष्ट?

ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू

। पेण । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण ते पळस्पे दरम्यान टोलवसुली सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात क्रॅश बॅरियर अर्थात लोखंडी संरक्षक भिंती उभारण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात असून, ठेकेदाराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नियमांना हरताळ फासल्याची चर्चा रंगू लागली आहे.

क्रॅश बॅरियरच्या उभारणीसाठी साधारणतः सहा फूट लांबीचे लोखंडी खांब किमान तीन फूट खोल खड्डा खोदून सिमेंट, खडी व वाळूच्या साहाय्याने मजबुतीने बसविणे आवश्यक असते. त्यानंतर काही दिवसांनी लोखंडी पत्रे नट-बोल्टच्या सहाय्याने जोडली जातात. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी अनेक खांब जेसीबीच्या सहाय्याने थेट जमिनीत दाबून बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे हे खांब रस्त्याच्या भरावावर बसविण्यात आले आहेत. पावसाळ्यात भरावाची माती सैल झाल्यानंतर हे खांब अधिकच कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत एखाद्या वाहनाची धडक क्रॅश बॅरियरला बसल्यास वाहन थांबण्याऐवजी संपूर्ण बॅरियरसह रस्त्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या सुरक्षेसाठी हे बॅरियर उभारण्यात आले, तो उद्देशच त्यामुळे फोल ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

साध्या धडकेनेही खांब उपटून निघू शकतील इतके हे काम कमकुवत दिसत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुरक्षाव्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी झाली होती का, असा सवाल आता वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी इंगोले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या कथित निकृष्ट कामाबाबत प्राधिकरणाची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या क्रॅश बॅरियरच्या कामाची तातडीने स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Exit mobile version