तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे आयोजन
। तळा । वार्ताहर ।
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुका कृषीस्तरीय स्पर्धेचे आयोजन दि.17 ते 25 फेब्रवारी दरम्यान तळा येथील जि.प. कन्या शाळेत करण्यात आले होते. यावेळी पाककृती स्पर्धेचे उद्घाटन तळा पंचायत समिती गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. या तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत 13 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने शाळांमधून मोठ्या प्रमाणाते परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच, या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. या अनुषंगाने सन 2024-25 या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले होते. या पाक कलाकृतीतून आपल्या पाल्याला सकस आहार देऊन भावी पिढी सशक्त सुदृढ व्हावी, तृणधान्याचा वापर दररोजच्या आहारात असावा, सेंद्रीय खतांवर केलेले धान्य हे आरोग्यदायी असते व त्यामधून मिळणारी प्रोटिन्स शरीराला मिळावे हा शासनाचा उद्देश आहे. तसेच, या पाक कृतीतून गृह उद्योग निर्माण करून बाजारपेठेत व्यवसाय उभा करून आर्थिक स्त्रोत निर्माण होऊ शकेल, असे देखील शिंदे यांनी सांगितले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी महादेव शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी निता खुराटे, बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके, जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे, किशोर पितळे, अदिती भायदे, स्वाती पाटील, ग्रामविस्तार अधिकारी पुष्पा नेरकर, अश्विनी वादळ आदी उपस्थित होते.
तृणधान्य पाककृती जनजागृती आवाहन
पुरुषोत्तम मुळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आधुनिक पिढी हि फास्ट फूड, जंगफूड, चायनीज फूडकडे जास्त वळताना दिसत आहे. मात्र, भावी पिढी सशक्त सुदृढ होण्यासाठी जंगफूडचे ग्रहण करु नये. ते आरोग्याला घातक असून विविध आजार उद्भवत आहेत. महिलावर्गांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तृणधान्यातून आहार तयार करून कुटुंबाला द्यावा. भावीपिढी सुदृढ होण्यासाठी लक्ष घालावे. तसेच, आपल्या पौष्टिक तृणधान्य पाककृतीची जनजागृती करावी, असे आवाहन केले आहे.
विजेत्यांचा सन्मान
पाक कलाकृती स्पर्धेत तृणधान्यांपासून पौष्टीक असे पदार्थ बनविण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मजगाव केंद्रातील रा.जि.प.शाळा रोवळे येथील कल्पना घाडगे, द्वितीय क्रमांक बोरघर हवेली केंद्र रा.जि.प.शाळा येथील जयश्री शिंदे व तृतीय क्रमांक निगुडशेत शाळा येथील वैभवी साळवी यांनी पटकावला आहे. तसेच, उत्तेजनार्थ म्हणून रतीका जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे रु. 5 हजार, 3 हजार 500 आणि 2 हजार 500 अशी रोख रक्कम बक्षिस स्वरूपी देण्यात आली.