स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीएनपी चषक 2025 पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवारी (दि.19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी व शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कुरूळमधील आझाद मैदानावर पीएनपी चषक 2025 क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने पीएनपी चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा रंगणार आहे.
अलिबाग, मुरुड व रोहा तालुका मर्यादित स्पर्धेत मुरूड डिफेन्डर्स, शहापूर स्माशर्स, खंडाळे स्टॅलिअन्स, आंबेपूर टायगर्स, रामराज रायडर्स, चौल चेसर्स, रेवदंडा रॉयल्स, वळके अवेंजर्स, बेलोशी बिग बुल्स, नांदगाव निंजास, मापगाव मार्वल्स, मुरूड थंडर्स, कुर्डूस किंग, चेंढरे चॅम्पीयन, सारळ स्ट्रायकर्स, उसरोली वंडर्स, खारगाव हंटर्स, वरसोली चॅलेंजर्स, थळ टायपहुन्स, आवास अल्फास, अलिबाग वॉरिअर्स, अलिबाग सुपर किंग, रोहा रेंजर्स, राजपुरी पॅथर्स या निमंत्रित 24 संघांचा सहभाग असणार आहे.
बुधवारी (दि. 19) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला प्रेक्षणीय सामना अलिबाग नगरपरिषद विरुद्ध अलिबाग अॅडव्होकेट इलेव्हन यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी प्रकाशझोतात या लढतींना सुरुवात होणार आहे. उद्घाटनीय पहिला सामना थळ टायपहुन्स विरुद्ध मुरूड थंडर्स या संघांमध्ये, तर दुसरा सामना चौल चेसर्स आणि रामराज रायडर्स या संघांमध्ये होणार आहे.
ही स्पर्धा पाहण्यासाठी सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमाततून घरबसल्या ऑनलाईन ही स्पर्धा पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.