700 वर्षे जुनी असल्याचा अंदाज
। महाड । प्रतिनिधी ।
दासगाव येथील दौलतगडावर रविवारी (दि.16) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळपास सातशे वर्षांपुर्वीची एक पाशाण गणेश मुर्ती सापडली आहे. ग्रामस्थांनी त्या पुरातन मुर्तींची विधीवत स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील परिसरात आतापर्यंत असंख्य पुरातन वास्तू व वस्तू सापडल्या आहेत. किल्ले रायगड परिसरात असंख्य तोफा, तोफगोळे, भांडी, वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. तर, महाड शहरात सावित्री नदीकिनारी इमारतींच्या बांधकामासाठी केलेल्या खोदकामात बहामी काळातील भांडी व अभुषणांचे अवशेष सापडले आहेत. त्यातच आता दासगाव येथील दौलतगडावर दौलतगड प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान तरुणांना तेथे दिड फुटाची पाषाण गणेश मुर्ती आढळून आली. पुरातत्व अभ्यासक प्रा. अंजय धनावडे यांनी या मुर्तीची पाहणी केली असता, साधारण 14 व्या शतकातील शिलाहार राजे वंशातील शिल्पशैलीचा प्रभाव असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही गणेशाची मुर्ती साधारण 700 वर्षे जुनी असल्याचे बोलले जात आहे. ही पाषाण मुर्ती डाव्या सोंडेची चतुर भुज मुर्ती असुन, ग्रामंस्थानच्यावतीने या गणेश मुर्तीची विधीवत स्थापना करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दौलत गडावर पुरातन विभागाकडून संशोधन होण्याची मागणी होत आहे.