। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात येणार्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याचे सातत्याने आढळून आले आहे. शहरात आल्यावर पर्यटकांना चुकीची माहिती देणे, जास्तीचे भाडे आकारणे, शहराची माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करणे असे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून, त्याद्वारे एक मोठे जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. दरम्यान, पर्यटकांच्या फसवणूक प्रकरणी माथेरानमधील सर्व व्यापारी आणि हॉटेल मालक यांनी एकजूट दाखवली असून पुढील आंदोलनाची दिशा आगामी काळात निश्चित केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्यावतीने शहरात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला व्यापारी फेडरेशन तसेच हॉटेल-रेस्टोरंट असो. आणि अन्य संघटनांनी सहभाग घेतला होता. यावेळी मनोज खेडकर, कुलदीप जाधव, रत्नदीप प्रधान, हेमंत पवार, शकील पटेल, जनार्दन पार्टे, शिवाजी शिंदे, अब्बास भाई राणीवाला, सुवासिनी शिंदे, जयश्री कदम, दीपक शहा, नितीन शहा, जुजार माथेरानवाला, वैभव पवार, योगेश जाधव, संजय कदम, चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, गिरीश पवार, अनंता शेलार आदींसह अनेक व्यापारी उपस्थित होते.
या बैठकीत चर्चा होत असताना माथेरानमध्ये काही विशिष्ट लोकांकडून येणार्या पर्यटकांची दिशाभूल केली जाऊन त्यांच्याकडून अव्वाच्यासव्व्वा पैसे उकळून लूटमार केली जात आहे. तसेच, माथेरानमध्ये पर्यटकांनी रात्रीचा मुक्काम न करता एक दिवसात फिरून माघारी लोणावळा, खंडाळा, इमॅजिका किंवा नेरळ-कर्जत परिसरातील फार्म हाउसवर जाऊन वास्तव्य करावे, असे काही लोक सुचवीत आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना रात्री काही भीती दाखवून येथून पिटाळून लावणे, घोड्यावरून कुठेही उतरणे, अस्तित्वात नसलेले नवीन पॉईंट निर्माण करणे, पॉईंट्सची चुकीची माहिती देऊन त्या पर्यटकाला माथेरान मध्ये रहाण्यापासून परावृत्त केले जात असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्याबाबत दिशा निश्चित करण्यासाठी आगामी काही दिवसात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीची बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.