। रसायनी । वार्ताहर ।
नक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे नगर परिषद हद्दीतील सर्वांना स्वतःच्या मालकीची सनद मिळणार आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी महत्वाची मदत होणार असून प्रत्येक नगरपरिषदेचा आर्थिक विकास होऊन नियोजन पुर्वक शहर तयार होईल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभागामार्फत नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ आणि नागरी स्वराज्य संस्थेच्या सहाय्याने भूसंदर्भीकरण व नगर भूमापन अभिलेख अद्यावतीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला. देशातील 152 नगर परिषदेची यात निवड झाली असून कोकण विभागात खोपोली आणि कुळगाव बदलापूर यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, खोपोली नगर परिषदेच्या सभागृहात नक्षा पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, उप अधिक्षक भूमी अभिलेख खालापूर प्रमोद जरग, खोपोली नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज पाटील, समाधान पाटील, माजी नगरसेवक, स्थानिक नागरीक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.