| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चई परिसरातील जमिनीच्या वारस नोंदीसाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ते न्यायालयात सादर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी संगनमत करून न्यायालयाची दिशाभूल केली आणि वारस मान्यता मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील फिर्यादीच्या आजोबा-आजींच्या मालकीच्या चई येथील विविध सर्वे क्रमांकांतील जमिनी स्वतःच्या नावे करण्याच्या उद्देशाने आरोपी क्रमांक एकने कर्जत न्यायालयात वारस मान्यतेसाठी अर्ज केला. यावेळी मृत आजोबा आणि आजींचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्याआधारे चुकीची माहिती देऊन वारस मान्यता मिळवल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयातही अर्ज करण्यात आला. या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रावर आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी क्रमांक एक आणि दोन यांना 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वरक करीत आहेत.






