जिल्ह्यात मियावाकी पद्धतीला पसंती
| सुधागड-पाली | वार्ताहर |
कमी जागेत देशी व स्थानिक झाडांची लागवडीतून घनदाट मानवनिर्मित जंगलांच्या निर्मितीसाठी अनेक पर्यावरण प्रेमी व विकासक रायगड जिल्ह्यात प्रयत्नशील आहेत. यासाठी मियावाकी पद्धतीचा अवलंब देखील केला जात आहे. यामुळे पशुपक्ष्यांना अन्न व निवारा मिळत आहे. जैवविविधता बहरते, शिवाय पर्यावरण संवर्धन सुद्धा होते.
सुधागड तालुक्यातील कुंभारघर येथील राजीव खन्ना यांनी आपल्या शेतातील जागेवर नुकतेच मियावाकी पद्धतीचा वापर करून अशा प्रकारे स्थानिक व देशी वृक्ष लागवड करून जंगल तयार केले आहे. जवळपास 30 गुंठ्यामध्ये 3000 झाडे लावली आहेत. तालुक्यातील वनस्पती अभ्यासक, बाग निर्माते व ही पद्धत वापरणारे अमित निंबाळकर यांनी सांगितले की, जपान येथील वनस्पती तज्ञ प्रा. मियावाकी यांनी या पद्धतीचा आविष्कार केला. मानवनिर्मित जंगल पद्धतीला मियावाकी पद्धत म्हणतात. यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी व स्थानिक वृक्षांची लागवड केली जाते. या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते म्हणूनच प्रा. मियावाकी म्हणतात ‘ही निसर्ग आणि विज्ञानाची शुद्ध मैत्री आहे’. मियावाकी जंगल हे घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, उदयोगसमूहांच्या जागा तसेच रस्त्यांच्या दुतर्फासुद्धा करता येते. ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे. ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होते. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात.
या तंत्रज्ञानात स्थानिक जागेवरील मूळ माती तीन फूट खोल खड्डा करून काढली जाते आणि पुन्हा तेथील चाळलेली माती, खत आणि भाताचे तूस यांचे मिश्रण करून भरली जाते. ही संपूर्ण जैविक पद्धती असून येथे सेंद्रिय घटकांचाच वापर होतो. रासायनिक खते, कीटकनाशकापासून हे तंत्रज्ञान मुक्त असते. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसर्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.
स्वदेशी स्थानिक वृक्षांना स्थान
वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते. मियावाकी पद्धतीत विदेशी वृक्षांना स्थान नसते. तर स्थानिक वृक्ष वापरले जातात. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते.
जिल्ह्यात काही जण आपल्या परसात, शेतातील मोकळ्या जागेत, माळावर या पद्धतीचा अवलंब करत आहेत. पर्यावरण संवर्धन व जैवविविधता टिकविण्यासाठी व मृदा संवर्धनासाठी या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे अनेकांना या पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला देतो व करून सुद्धा देतो.असे बागकाम तज्ज्ञ अमित निंबाळकर यांनी सांगितले.
दाट जंगल फार कमी राहिलेत त्यामुळे पशुपक्षी जास्त फिरकत नाहीत आणि जमिनीची धूप वाढली आहे. मियावाकी लागवड पद्धत एकदम सोपी असल्याने तशी लागवड करण्याचा निर्णय घेतला.
राजीव खन्ना, विकसक, कुंभारघर, सुधागड
कमी जागेत अनेक वृक्ष
साधारण एक हजार चौरस फूट जागेत 250 मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या 40 पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते. ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात.