। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महसुलासाठी नाही, तर क्रिकेटचा जगभरात प्रसार व्हावा या हेतूने ‘आयसीसी’ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलार्डाईस यांनी व्यक्त केले.
यंदा जुलै-ऑगस्टमध्ये बर्मिगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार असून यात महिलांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेटचे पर्दापण होणार आहे. त्यानंतर लॉस एंजेलिस येथे 2028 साली खेळवल्या जाणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा ‘अतिरिक्त क्रीडा प्रकार’ म्हणून समावेश होण्याबाबत ‘आयसीसी’ आशादायी आहे. “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आल्यास ‘आयसीसी’च्या सर्व सदस्य मंडळांना त्यांच्या देशातील सरकारचे साहाय्य मिळू शकेल. तसेच राष्ट्रीय ऑलिम्पिक चळवळीतील सहभागामुळे त्यांना देशात अतिरिक्त सुविधाही उपलब्ध होतील,’’ असे अॅलार्डाईस यांनी एका मुलाखतीत सांगितले.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास अधिक महसूल मिळेल, असा आम्ही विचारही केलेला नाही. क्रिकेट हा खेळ अजूनही काही देशांमध्ये तितकासा लोकप्रिय नाही. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारासाठी ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असेही अॅलार्डाईस यांनी नमूद केले.
क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळले गेल्यास आमच्या 106 सदस्य राष्ट्रांना सरकारसोबतचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी मदत होऊ शकेल. काही देशांमध्ये ऑलिम्पिक खेळांना अतिरिक्त महत्त्व दिले जाते. – अॅलार्डाईस