चित्रा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। सायली पाटील । अलिबाग ।
गेले बरेच दिवस यश रानडे ऑफिशिअल या युट्युब चॅनलवर जोरदार गाजत असलेल्या राजं या! या गाण्याच्या ऑफिशिअल ट्रेलरनंतर या व्हिडीओ गाण्याचे पी.एन.पी नाट्यगृह अलिबाग येथे रविवारी (दि.3) सायंकाळी प्रीमिअर रिलीज करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प.सदस्या चित्रा पाटील उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून समाज माध्यमांवर गाजत असलेले गायक, संगीत दिग्दर्शक प्रशांत नाकती, गायिका सोनाली सोनावणे, अभिनेता – विशाल फाळे, निक शिंदे, अभिनेत्री तृप्ती राणे हे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाच्या वेळी दिग्दर्शक सचिन कांबळे व टीम यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामातून लाखोंच्या घरात व्ह्यूज गेले असून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेले सर्व अल्बम्स सादर करून त्यांच्या यशाचा प्रवासाला प्रदर्शित करण्यात आले. राजं या! या गाण्याच्या व्हिडीओतून फक्त महाराजांचा इतिहास सांगितला नसून सध्याच्या काळात घडत असलेल्या गोष्टी आणि महाराजांचा काळ या दोन्ही गोष्टींमधील फरक अतिशय साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने पटवून दिला आहे. महाराजांनी आणि स्वराज्याच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य उभारलं आणि गडकिल्ले बांधले, जिंकले आज त्याच गडकिल्ल्यांवर अनेकजण दारू पिऊन पार्ट्या करतात, प्रेमाची बदामं कोरतात आणि स्त्रीयांना मातेसमान माना असा संदेश देणार्या महाराजांच्या याच स्वराज्यात आज स्त्रियांची सुरक्षितता हा सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच गडकिल्ल्यांचे जतन न करता त्यांची विटंबना करीत आपणच आपल्या इतिहासाची कशी अवहेलना करतोय हे मांडण्याचा प्रयत्न या गाण्यात केला आहे. राजांचे कार्य, मावळ्यांचे कर्तृत्व डोळ्यासमोर आणून गडकिल्ल्यांचे जतन करणे व स्वराज्याचे पावित्र्य राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे लक्षात घेत आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे हे पटवून दिले आहे.
राजं या! या गाण्यात अलिबागमधील 100 कलाकारांनी काम केले असून या गाण्याचे चित्रीकरण अलिबागच्या कुलाबा किल्ल्यामध्ये झाले आहे.हे गाणं यश रानडे प्रस्तुत, सचिन कांबळे कथा-पटकथा व दिग्दर्शित, केतन मुरकर निर्मित आहे. तसेच यामध्ये संकल्पना सचिन कांबळे, यश रानडे, सहाय्यक निर्माता संतोष हरमलकर, स्वप्निल शिंदे, गायक मधुर शिंदे, गीत संगीत मनिष अनसुरकर हे असून प्रोग्रामिंग आणि अरेंजिंग सुदेश गायकवाड, छायाचित्रण सुनित गुरव, संकलन व डि.आय. संदेश कोळी, व्ही.एफ.एक्स. साहिल शेख, सहाय्यक दिग्दर्शक विशाल गायकवाड, समिर गायकवाड, सहाय्यक छायाचित्रण वैभव पडवळ, स्थिर चित्रण शुभम पानपाटील, कला दिग्दर्शक रसिक म्हात्रे (पद्मश्री आर्ट), सहाय्यक कला दिग्दर्शक किशोर म्हात्रे, कॅलिग्राफी आणि पोस्टर डिझाइन निलेश भगवान, सहाय्यक मेकअप रश्मी पाटील, प्रोडक्शन हेड आशिष बनाटे, मॅनेजमेंट टीम रितेश कश्यप, सिद्धू यांनी केले आहे. तसेच या गाण्याच्या व्हिडिओचा पुढील भागही लवकरच आपल्या भेटीला येणार असल्याचेही या टीमने जाहीर केले आहे.
अलिबाग ही कलाकरांनी नटलेली नवरत्नांची खाण आहे. आणि राजं या! या गाण्यामध्ये तर अतिशय दर्जेदार असा अभिनय असून अतिशय प्रोफेशनल लेव्हलला हे गाणं केलं आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्तमपणे निभावलं आहे. कोणतीही संकल्पना डोक्यात येणें हे सोपे असते पण ते सादर होत असताना त्या भावना लोकांपर्यत पोहोचवणे हे प्रत्येकालाच जमत नाही. आणि त्या भावना फार उत्कृष्टरित्या या टीमने पोहोचवल्या आहेत.
चित्रा पाटील, जि.प.सदस्या
गड-किल्ल्यांची होणारी दुर्दशा, किल्ल्यांची होणारी विटंबना हे सर्व थांबवण्यासाठी सुचलेल्या संकल्पनेतून आमच्या टीमने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. या गाण्याला भरभरून प्रतिसाद देऊन या गाण्याचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा हाच आमचा मानस आहे.
सचिन कांबळे, दिग्दर्शक, राजं या!