क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट स्पेशल ट्रेन

| मुंबई | वृत्तसंस्था ।

क्रिकेट विश्वचषकामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी अहमदाबाद जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक आणि पश्चिम रेल्वेने दोन अशा तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिटेक प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

विश्वचषकाचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईसह देशभरातून क्रिकेट प्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत . यापूर्वीच मुंबईतून अहमदाबाला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांची गैरसोय लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने शनिवारी क्रिकेट स्पेशल गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री या तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनसहून अहमदाबादकरिता रवाना होणार आहेत. या स्पेशल गाडयांचे आरक्षण शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

पहिली क्रिकेट स्पेशल ट्रेन
ट्रेन क्रमांक 01153 सीएसएमटी -अहमदाबाद स्पेशल एक्सप्रेस शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता सुटून अहमदाबादला रविवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन 01154 अहमदाबाद-सीएसएमटी विशेष ट्रेन रविवारी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद स्थानकात थांबा दिला आहे.

दुसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन
ट्रेन क्रमांक 09001 वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 09002 ट्रेन सोमवारी पहाटे 4 वाजता सुटून दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या ट्रेनला बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबा दिला आहे.

तिसरी क्रिकेट स्पेशल ट्रेन
ट्रेन क्रमांक 09049 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल ट्रेन शनिवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 8. 45 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीकरिता ट्रेन क्रमांक 09050 ट्रेन सोमवारी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुटून दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचेल. या ट्रेनला बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकात थांबा दिला आहे.

Exit mobile version