| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला रविवारी जिल्ह्यातील विविध मैदानांवर शुभारंभ करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 32 अकॅडमी व क्लबच्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून, स्पर्धा प्रथम साखळी व त्यानंतर बाद फेरीनुसार होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेण, चिचकर मैदान महाड, फॉर्टी प्लस गावदेवी मैदान टेंभोडे पनवेल, जय हनुमान क्रीडांगण जुई कामोठे, छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिवाजी नगर गव्हाण, भैरवनाथ क्रिकेट ग्राउंड विचुंबे अशा सर्व मैदानांवर संपूर्ण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पंच व गुणलेखक सामानाधिकारी म्हणून काम करणार आहेत. स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड रायगडच्या संघात केली जाणार असून, पुढे रायगडचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विविध वयोगटात क्रिकेट स्पर्धेचे व कॅम्पचे आयोजन सातत्याने होत असल्याने जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना चांगल्या दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.







