क्लिक-फ्लिक स्पोर्ट्स अकॅडमी विजयी; निशी विठलांनीचे 7 बळी
| पोयनाड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय 40 षटकांच्या ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत क्लिक-फ्लिक स्पोर्ट्स अकॅडमी खोपोली संघांनी अटीतटीच्या सामन्यात कोंढाळकर’स् क्रिकेट अकॅडमी लोधिवली संघावर विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. खोपोली संघाची जलदगती गोलंदाज निशी विठलांनीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर खोपोली संघांनी अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या खोपोलीच्या संघाने 40 षटकांमध्ये 180 धावा फलकावर नोंदवल्या त्यामध्ये नैतिक कारिया यांनी सलामीला येऊन 111 चेंडूंचा सामना करत 13 चौकार व 2 षटकार ठोकत सर्वाधिक 99 धावा काढल्या, त्याला श्रेय पडळकर यांनी 24 काढून दुसऱ्या बाजूने साथ दिली. कोंढाळकर’स् क्रिकेट अकॅडमी कडून अथर्व महामुनकर यांनी 2 सुयश पारंगे, निषाद ठाकूर, रिषभ ठाकूर, ओम सांगळे, सोहम बोगाणे, श्रेयश डी यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला. प्रतिउत्तरात लोधिवली संघांनी कडवी झुंज देत 38 षटकांमध्ये सर्व गडी बाद 163 धावा केल्या, स्वरा खेडेकर हिने संयमी फलंदाजी करत 41 तर दुसऱ्या बाजूने निषाद ठाकूर यांनी 35 धावा केल्या, दोन्ही फलंदाज बाद झाल्या नंतर सामना खोपोली संघाकडे झुकला, खोपोली संघाकडून निशी विठलांनी हिने भेदक गोलंदाजी करत 7 फलंदाजांना तंबूत धाडले. वैभवी कुलकर्णी व स्तुती विठलांनी यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.
संपूर्ण सामन्यात दोन्ही बाजूने मुलींचे वर्चव दिसून आले.अटीतटीच्या सामन्यात खोपोली संघाने विजय मिळवला आहे. निशी विठलांनी हिला सामनावीर, स्वरा खेडेकर हिला स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, इमॅर्जिंग प्लेयर नैतिक करिया, निषाद ठाकूर, रिषभ ठाकूर तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून वैभवी कुलकर्णी, वांशिका मोहिते, सुयश पारंगे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे सदस्य राजेंद्र कोंढाळकर, झुंझारचे सचिव किशोर तावडे, सदस्य अजय टेमकर, सुजित साळवी, उमाशंकर सरकार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
