विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा;सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकांना ठोसे

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.

गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधार्‍यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसर्‍या बाजूला लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली. मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती.

आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विरोधकांना घेरण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांनी ठाकरे-पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. सत्ताधार्‍यांच्या घोषणाबाजीने विरोधी पक्षाचे आमदार चिडले. त्यांनीही थेट सत्ताधार्‍यांना भिडत त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. आमदार अमोल मिटकरी, रोहित पवार, चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधार्‍यांना भिडण्यात अग्रभागी होते. यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश शिंदे आणि मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

Exit mobile version