| पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांसह इतर कार्यकारिणीतील विश्वस्तांविरोधात बुधवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून रितसर चौकशी सुरु केली आहे.
18 वर्षांनंतर हे विनापरवानगीचे प्रकरण बाहेर आल्याने मागील 18 वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण मिळवले असून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.2006 ते 2024 या दरम्यान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाने ही फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे.
सिडको मंडळाने नवीन पनवेल येथील सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक 41 येथील जागा नोकरदार महिलांच्या वसतिगृहासाठी या संस्थेला दिली होती. परंतु शिक्षण संस्थाचालकांनी या भूखंडाचे बनावट दस्त बनवून हा भूखंड शिक्षण संस्थेसाठी खरेदी केल्याचे भासवले. तसेच त्यावर महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थेचे कामकाज सुरु केले.
तसेच ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाने देवद येथील जागा धनराज विस्पुते यांच्या नावावर असताना ती जागा ऋषिकेश शिक्षण संस्थेच्या नावावर दाखवून शिक्षण विभागासमोर मान्यता घेताना बनावट जागेचे कागदपत्र दाखविण्यात आले. त्यानंतर त्या जागेवर शैक्षणिक विभाग सुरु केले. येथील शाळेच्या इमारत बांधकामासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सरकारी यंत्रणांची कायदेशीर परवानगी घेतली नाही.
या संस्थेचे धनराज विस्पुते, संगिता धनराज, देविदास विस्पुते, परिमेला करंजकर, दिलीप कुमार चव्हाण, शोभा दिलीप चव्हाण, महिंद्र विस्पुते, स्मिता विस्पुते, रमेश विस्पुते, वंदना बिरारी, राकेश सोनार, मनोज सोनार, प्रशांत भामरे, विक्रम धुमाळ या विश्वस्तांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त बनवून सरकारी कार्यालयांची फसवणूक करणे याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.