। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील नारपोली-कोन येथील भुषण लॉजिंग अँण्ड बोर्डींगमध्ये चालणार्या वेश्या व्यवसायावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सहा पिडीत महिलांची सुटका केली आहे. तर, लॉज मॅनेजर, चालक व वेटर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात अनैेतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना भुषण लॉजिग अॅण्ड बोर्डिंग येथील मॅनेजर वेश्या व्यवसाय करीत असून काही मुली व महिलांना वेश्यागमनाकरीता ठेवण्यात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हेशाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून रात्री सात वाजण्याच्या सुमारास या लॉजवर छापा टाकला. यावेळी सहा महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या आढळून आल्या. याप्रकरणी लॉज मॅनेजर किशोर गर्दे (39), वेटर अभिलाष कृष्णा शेट्टी (26), लॉजचालक लोकेश देवराज गौडा (39) व अन्य एक लॉज चालक अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.