देशात घोंघावतंय झिका व्हायरसचं संकट

दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात कोरोना व्हायरस संकट काळात आणखी एका झिका व्हायरसने चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे केरळमध्ये हायअलर्टची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर दिल्लीहून तज्ज्ञांची टीम केरळकडे रवाना झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत सुमारे 18 लोकांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. केरळच्या दौर्यावर गेलेल्या दिल्ली एम्स टीमने झिका व्हायरसबद्दल देशातील इतर राज्यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या इशार्‍यानंतर राजधानी दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांना अलर्ट केले आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही झिका व्हायरसबाबत अलर्ट करण्यात आले आहे.

केरळमध्ये झिका व्हायरसची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला होती. सध्या ही महिला आणि तिचे बाळ बरे आहेत. झिका व्हायरसचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले आहेत, असे येथील आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. झिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.दरम्यान, कोरोनामुळे यापूर्वीच राज्यांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ केरळ सरकारला अडचणीची ठरू शकते.

Exit mobile version