राजकारणात टीका करताना आत्मभान गरजेचे – चित्रलेखा पाटील

शेडसईत विद्यार्थिनींना सायकल वाटप
| रोहा | जितेंद्र जोशी |

काही दिवसांपूर्वी शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू विद्यार्थिनींना होत असलेल्या सायकल वाटप कार्यक्रमावरून एका लोकप्रतिनिधीने बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील भागीरथीखार येथील सायकल वाटप कार्यक्रमात समाचार घेताना शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी राजकारणात टीका करताना आत्मभान ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत संबंधित लोकप्रतिनिधींना टोला लगावला आहे.

याप्रसंगी बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, आमच्या सायकल वाटप कार्यक्रमावरून काही लोकप्रतिनिधी बेताल आणि खालच्या दर्जाच्या भाषेत जाहीर सभेत टीका करत आहेत. छत्रपतींचे नाव घ्यायचे; परंतु महिलांवर टीका करताना पातळी सोडून बोलायचे, हे योग्य नाही. महनीय व्यक्तींचे भाषणात केवळ नाव घेऊन फायदा नाही, तर त्यांच्या आचार-विचारांचा अंगिकारदेखील गरजेचे आहे. शेकापच्या माध्यमातून होत असलेले सायकल वाटप ही सावित्रीबाई फुले यांना आदरांजली आहे. जमिनीचे दलाली करणारे लोक या विभागात फिरत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. जनतेचा सन्मान करणारा लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे. आज राज्यातील परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराज असते तर म्हणाले असते, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. रोहा तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी 1000 सायकली वाटप करण्याचा मनोदय चित्रलेखा पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. शेकापला सक्षम करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम करावे, असे देखील पाटील यांनी सांगितले. शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील 35 विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

या कार्यक्रमाला रोहा पं.स. सभापती गुलाब वाघमारे, शेडसई सरपंच प्रिया कडू, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी, शेणवई ग्राप सदस्या रुपाली मढवी, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर, गोपीनाथ गंभे,आर्या शिंगरे, मीनाक्षी म्हात्रे, सुजाता म्हात्रे, गीता गंभे, लियाकत खोत, संदेश विचारे, विठ्ठल मोरे, जीवन देशमुख, रत्नादीप चावरेकर, विकास भायतांडेल, गोविंद भायतांडेल, राजश्री न्हावकर, मंगेश ढमाल, नारायण गायकर, राज जोशी, मनोहर वारगे, हिराजी कांडणेकर, शशिकांत कडू, अमोल शिंगरे, अभिजित शिंगरे, तानाजी म्हात्रे, विलास म्हात्रे, देवचंद्र म्हात्रे आदी मान्यवर व महिला भगिनी यांच्यासह चणेरा विभागातील शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version