चिपळुणात मगरींचे दर्शन दुर्मिळ

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
शहरातील पाणथळी भागात नेहमी मगरींचे दर्शन व्हायचे. पाणथळी भागातील चिखलात मगरी बसलेल्या असायच्या, आता पाणथळी भागच भराव टाकून नष्ट केल्या जात आहे. त्यामुळे चिखलात बसलेल्या मगरी पाहणेही दुर्मिळ होण्याचा धोका आहे. 1990 पासून पाणथळामधील सुमारे एक तृतीयांश पाणथळे नष्ट झाली आहेत. अनेक छोटी-मोठी पाणथळे अखेरच्या घटका मोजत आहेत. पर्यावरणाचा कायदा असूनही त्यांना संरक्षण प्राप्त न झाल्याने जागा समस्यांनी ग्रासलेल्या आहेत.
चिपळूण शहरातील पाणथळी भागात सर्रास मगरी आढळतात. दुपारच्यावेळी मगरी उन्हात बसण्यासाठी पाण्याबाहेर येतात. नंतर पुन्हा पाण्यात जातात. शहरांमधील पाणथळी भागात मगरी निवांत राहत होत्या. नागरिकांच्या दारात येणार्‍या मगरींना प्राणीमित्र आणि वन विभागाचे कर्मचारी नैसर्गिक अधिवासात सोडत होते. या मगरींनी आतापर्यंत कधी नुकसान पोचविले नाही. शहरात आढळणार्‍या मगरी एक प्रकारे वैभव मानले जात होते. मात्र, पाणथळींबरोबर मगरींचे अस्तित्वही शहरातून नष्ट होण्याचा धोका आहे.
पाणथळ जागांचा प्रमुख शत्रू मानवच आहे. लोकवस्तीचा व मानवी गरजांचा दबाव या जागांवर आहे. शहरात लोकवस्ती वाढत गेल्याने लँड माफियांकडून पाणथळींच्या जागा बळकाविल्या गेल्या. त्या विरोधात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटनांनी पावले उचलली नाहीत. सध्या तर अनेक रेडझोन जागेत, नदीकाठी, खाडी किनारी इमारती उभ्या आहेत. त्यामुळे महापुरासारखे संकट वाढले आहे. बहादूरशेख नाका ते पाग पॉवरहाऊस, खेंड, बावशेवाडी ते मिरजोळीच्या डोंगरात पूर्वी नैसर्गिक झरे, विहीरी आणि पाण्याचे डोह आढळून यायचे. कालांतराने डोंगर कपार्‍यातील दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले. पावसाबरोबर ते वाहून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले. पाणथळ जागांवर कचरा, प्लास्टिक, रसायने टाकून या जागांवर असलेले जलचरचे अधिवास संपुष्टात आणले गेले.

Exit mobile version