| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर गावात रविवारी मध्यरात्री एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. मध्यरात्री ठीक 1 वाजण्याच्या सुमारास येथील एका हॉटेलच्या आवारात पूर्ण वाढ झालेली आणि धष्टपुष्ट महाकाय मगर अचानक पाहायला मिळाल्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे 1 वाजता हरिहरेश्वर येथील एका हॉटेलजवळ मगर फिरत असल्याची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता हरिहरेश्वरचे जागृत रहिवाशी सचिन गुरव, पप्पू टाकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही मगर अंधाराचा फायदा घेऊन कुठेतरी निघून जाण्याची किंवा नागरिकांवर अटॅक करण्याची शक्यता होती. त्यामुळे या धाडसी तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता अत्यंत संयमाने व सतर्कतेने त्या मगरीवर सतत लक्ष ठेवून पहारा दिला. तसेच, तात्काळ याची माहिती वनविभाग आणि स्थानिक सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि सर्पमित्र क्षणाचाही विलंब न करता अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाचे अधिकारी नागरगोजे, ननावरे, वाहनचालक केळसकर यांच्यासह सर्पमित्र व वन्यजीव रक्षक गणेश कुडगावकर आणि सुजल खेराडे यांनी सहभाग घेतला. या सर्व टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अत्यंत धोकादायक परिस्थितीत मोकळ्या जागेवर रेस्क्यू ऑपरेशन राबवले. मगरीचा आकार मोठा आणि ताकद जास्त असल्यामुळे तिला पकडणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र, सर्वांनी मिळून मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत, सुरक्षेचे सर्व नियम पाळून त्या पूर्ण वाढ झालेल्या व सुदृढ मगरीस कोणतीही दुखापत न पोहोचवता अत्यंत शिताफीने जेरबंद केले. त्यानंतर तिला त्वरित तिच्या सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त केले.







