साडेतीन किलो सोन्यासह पाच लाखांची चोरी
| खोपोली | प्रतिनिधी|
एक्स्प्रेस वे वरील फुडमॉलमध्ये थांबलेल्या एका खाजगी बसमधून चोरट्यांनी साडेतीन किलो सोने आणि पाच लाखांची रोकड लंपास करण्याची घटना घडली.
महेंद्र नागाराज मालू (वय 39)हे सोन्याचांदीचे व्यापारी हैद्राबाद ते मुंबई असा ऑरेंज ट्रॅव्हल्स (एमपी-09-एफऐ-93038) मधून प्रवास करीत होते. निशीसागर हॉटेलच्या पार्किंगमध्ये बस चहापानासाठी थांबली असता चोरट्यांनी सीटवरील बॅग कटरच्या सहाय्याने कापून त्यामधील साडेतीन किलो सोने आणि पाच लाखाची रोख रक्कम असा एकून 2 कोटी 8 लाख 15 हजाराचा ऐवज चोरला असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे. खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश कदम करीत आहेत.