| खरोशी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील वाशी येथील श्री भवानी जगदंबा देवी देवस्थान वाशीची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. नवसाला पावणार्या जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्यात देवीची सुमारे चार फूट उंचीची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. देवगिरी साम्राज्याचे राजे रामदेवराव यादव यांचे पुत्र भीमदेव यादव यांनी तेरावा शतकात जगदंबा देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांनी सुद्धा जगदंबा देवीचे दर्शन घेतले आहे, असे बोलले जाते. पेण तालुक्यासह मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, नाशिक यासह अन्य शहरातन हजारो भाविक येतात.
जोखणे तुला करणे हा एक नवस फेडण्याचा प्रकार आहे यासाठी मोठ्या वजन काट्याचा उपयोग करतात नवस फेडणार्याने नारळ, गूळ, कलिंगड, फळे, मिठाई यापैकी कोणतीही एका वस्तूंची स्वतःच्या वजनाएवढी तुला करून नवस फेडायचा असतो. ज्या पारड्यात मिठाई ठेवली जाते त्या पारड्यात ऊस किंवा चाफ्याची फांदी ठेवण्याची पारंपारिक प्रथा आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात बगाड फिरवण्याची प्रथा आहे. एका उंच खांबावर आडवा बांबू बांधून त्याच्या दोन्ही बाजूला समान वजन असलेल्या व्यक्ती गळ लावून घेत असत व त्यानंतर हा आडवा बांबू पाच वेळा फिरवला जातो.





