महिलांची एसटीला पसंती
मिनिडोअर वाल्यांचा धंदा मंदावला, उपासमारीची वेळ
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे (एसटी) तिकीट महिलांसाठी अर्धे केल्याने सर्वच महिलांचा कल एसटीने प्रवास करण्याकडे आहे. यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये सेवा देणार्या मिनिडोअर चालक-मालकांचा धंदा निम्म्याने कमी झालेला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली. जिल्ह्यातील गावखेड्यांतील ग्रामस्थ कामानिमित्त व बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत-जात असतात. एसटीच्या गाड्यांच्या कमी व नियोजित वेळेतील फेर्यांमुळे अनेकजण मिनिडोअरला पसंती देतात.
मात्र, एसटीचे तिकीट महिलांसाठी अर्धे झाल्याने सध्या हे चित्र बदलले आहे. कारण, बहुतांश महिला ‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’ या एसटीच्या ब्रीदवाक्यप्रमाणे वागताना दिसत आहेत. बस स्थानकात एसटीची वाट पाहत महिला दिसतात. एसटीनेच प्रवास करतात. यामुळे मिनिडोअर चालक-मालकांचा धंदा मात्र पुरता बसला आहे. अगोदरच कोविडमुळे नुकसान सोसावे लागले होते आणि आता पुन्हा प्रवासी मिळत नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत पालीतील मिनिडोअर मालक दिनेश बुरुमकर यांनी कृषीवलला सांगितले की, शासनाने हा निर्णय घेताना आमचाही विचार करणे गरजेचे होते. स्वतः मुख्यमंत्री रिक्षा चालक होते. त्यामुळे त्यांना रिक्षा चालकांची व्यथा माहिती असणार. एसटीचे अर्धे तिकीट झाल्याने सध्या महिला मिनिडोअरमध्ये बसत नाहीत. अशावेळी किमान प्रवासीसुद्धा मिनिडोअरमध्ये होत नसल्याने नुकसान सहन करावे लागते. दिवसभर प्रवाशांची वाट पाहात थांबावे लागते. अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा रिक्षा व मिनिडोअर चालक व मालकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
शासनाने रिक्षा व मिनिडोअर चालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. आम्हालाही कुटुंब आहे. वाढत्या डिझेल दरामुळे आम्हाला भाडे कमी करणे शक्य होत नाही. तरीही आम्ही परवडणारे भाडे घेतो. कोरोना काळात एसटी बंद असताना रिक्षा व मिनिडोअर चालक व मालकांनी लोकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. रुग्ण, प्रसूतीच्या महिला, वृद्ध यांना रुग्णालयात नेले, कोविडची लस देण्यासाठीसुद्धा नेले आहे.
– महेश पोंगडे, मिनिडोअर चालक, पाली