| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली- सुधागडसह जिल्ह्यात पावसाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त पावसाच्या सुरुवातीला मिळणाऱ्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे खवय्ये आनंदी आहेत. आरोग्यवर्धक, चविष्ट व लज्जतदार मूठ्यांना खवय्यांची पसंती असते. गावागावात रात्री अनेकजण मुठे पकडण्याची मज्जा लुटताना दिसत आहेत. स्वादिष्ट मुठ्यांचा जेवणात समावेश म्हणजे एक पर्वणीच आहे.
पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगर उतारावर जमीन ओली झाली. गवताची कोवळी पाती डोलू लागली. कोवळ्या गवतावर गुजरान करणारे व फक्त पावसाच्या सुरुवातीलाच बाहेर पडणारे मूठे बिळातून बाहेर आलेले पहायला मिळत आहेत. सध्या चिकन मटणाचे भाव देखील वधारले आहेत. अशावेळी फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे मुठे खवय्यांना मेजवानी ठरतात. आज वाढते प्रदूषण, शहरीकरण व बांधकामे यामुळे मुठ्यांची निवास्थाने व अधिवास नष्ट होत आहे. तसेच पावसाचा अनियमितपणा या कारणांमुळे प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे.
आकर्षक रंग
इतर खेकड्यांपेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्यांचा रंग तजेलेदार काळ व पिवळा असतो. पाठिचा भाग थोडा गोलाकार असतो. पाय व नांगडे पांढरे-पिवळे तजेलदार असतात. एक नांगडा मोठा तर एक छोटा असतो. या सर्व वैशिष्यांमध्ये इतर खेकडे आणि चिंबोऱ्या यामध्ये ते उठून दिसतात.
चविष्ट आणि आरोग्यवर्धक
आकाराने लहान असल्या तरी त्यांचे मांस चविष्ट व आरोग्यवर्धक असते. सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढुन त्यामध्ये मुग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधुन कालवण तयार केले जाते.







