विसर्जनानंतर खवय्यांची बाजारपेठेत गर्दी; चिकन-मटणासह मच्छी मार्केटही फुलले
| चौल | प्रतिनिधी |
गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर मांसाहारावर ताव मारण्यासाठी खवय्यांनी रविवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. गणेशोत्सवाच्या काळात अनेकांनी मांसाहार टाळला होता. त्यामुळे विसर्जनानंतर मटण, चिकन आणि मच्छी खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. मच्छी मार्केटमध्येही सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती.
बाप्पाच्या विसर्जनानंतर मांसाहाराचा बेत आखलेल्या अनेकांनी सकाळीच मटण आणि चिकनच्या दुकानांकडे धाव घेतली. काही ठिकाणी दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा पहाटेपासूनच लागल्या होत्या. मच्छी मार्केटमध्येही पापलेट, सुरमई, बोंबिल, कोलंबी अशा विविध प्रकारच्या मच्छिची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. दररोजपेक्षा बाजारपेठेत चांगलीच वर्दळ दिसून आली.
मटणाचा दर साधारण 800 ते 1000 प्रतिकिलो, चिकन 250 ते 280 प्रतिकिलो, तर मच्छीच्या प्रकारानुसार दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागणी वाढल्याने काही ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दरम्यान, बाप्पाला निरोप दिल्यानंतर बाजारपेठेत मटण, चिकन आणि मच्छी खरेदीसाठी झालेली गर्दी चर्चेचा विषय ठरली.
गणेशोत्सवात मांसाहार केला नाही. आज बाप्पाला निरोप दिल्यानंतर कुटुंबासाठी मटण घेण्यासाठी आलो आहे. गर्दी असली तरी सणानंतरचा हा दिवस असल्याने खरेदीचा उत्साह आहे.
सुजित पाटील,
ग्राहक
नंदकुमार निकामे,
विसर्जनाच्या दिवशी आणि त्यानंतर मटण-चिकनला मागणी वाढते. यंदाही सकाळपासून ग्राहकांची मोठी गर्दी आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पहाटेपासून तयारी केली होती.
विक्रेता
अनेकांच्या घरामध्ये दहा दिवसांचे गणपती बाप्पा असल्याने समाजबांधव मासेमारीसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे मच्छीची आवक कमी आहे. परंतु, तरीही आज विक्री चांगली झाली.
राजश्री गणतांडेल,
मच्छी विक्रेती
